मायग्रंट डायरीज: टिंकू शेख  “तशी गरज नसती तर आम्ही आमचं जन्माचं गाव सोडलं असतं का”, पश्चिम बंगालमधील स्थलांतरित मजूराचा प्रश्न.

13, Jun 2020 | CJP Team

कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी झगडत असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या हृदयद्रावक संघर्षाची शोकांतिका सध्या आपल्या डोळ्यांसमोर उलगडत आहे. मात्र ‘स्थलांतरित मजूर’ या शब्दांमागे अनेक लोकांच्या अभूतपूर्व कहाण्या लपल्या आहेत. या कहाण्या आहेत रोजच्या आयुष्यातील लहान-मोठ्या संघर्षांच्या, शेकडो मैलांच्या प्रवासांच्या, आयुष्याला अर्थ देणाऱ्या छोट्या छोट्या आनंदांच्या आणि सातत्याने पिच्छा पुरवणार्‍या भीतीच्या. फक्त या शब्दामागे लपलेले हे तपशील जेव्हा उघड होतात, एखाद्या आपत्तीमध्ये तीव्र वेदना सोसत असलेल्या एखाद्या माणसाचे, स्त्रीचे किंवा मुलाचे शब्दचित्र रेखाटले जाते तेव्हाच या आपत्तीचा राक्षसी आवाका खऱ्या अर्थाने उघड होतो. 

एप्रिल 2020 मध्ये, मदतीच्या हाकेला ओ देऊन सीजेपीने मुंबईमधील टिंकू शेख आणि इतर पाच कामगारांना रेशन किट्स देऊन मदत केली होती. आंतरराज्य प्रवास सुरू झाल्यावर टिंकू पश्चिम बंगालमधील त्याच्या घरी परत गेला. आता त्याच्या होम-क्वारंटाईनचे (घरात विलगीकरण) शेवटचे काही दिवस बाकी असताना, त्याला काय काय सहन करावे लागले हे त्याने आम्हाला सांगितले. ही त्याची कहाणी आहे.

आम्ही 63 जणांनी चार दिवस आणि चार रात्री एका उघड्या सहा-चाकी ट्रकमधून प्रवास केला,” महाराष्ट्रामधल्या ठाण्यातील कापूरबावडीपासून पश्चिम बंगालच्या बिरभूममधील रामपूरहाटपर्यंत त्याने आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या प्रवासाचे वर्णन करताना टिंकू शेख सांगतो. “ट्रकमध्ये दिवसा आम्ही आळीपाळीने बसायचो आणि उभे राहायचो. रात्री झोपण्यासाठी कधी कधी आम्हाला एकमेकांच्या अंगावर झोपायला लागायचे. ट्रकमध्ये बांधलेल्या एका दोरखंडाला टांगलेल्या आमच्या बॅगा आमच्या डोक्यावर लटकत असायच्या” इतक्या छोट्या जागेत एवढे लोक कसे काय मावले याचे वर्णन करताना शेख म्हणाला.

गावाकडे 27 वर्षांच्या तरुण शेखला एक बायको आणि 4 वर्षांची मुलगी आहे. त्याचे आई-वडील सुद्धा बंगालमध्ये राहतात. “गरज नसती तर आम्ही आमच्या आईवडिलांचं घर आणि ज्या गावात जन्मलो तिथल्या सुखसोयी सोडून इथे आलो असतो का?” तो विचारतो. “आमच्या मालकीची कधीही फारशी जमीन नव्हती. जी काही थोडीशी होती तिचीपण वडिलांच्या तीन भावांमध्ये वाटणी झाली,” तो सांगतो. 

शेखची पत्नी सुद्धा आजारी आहे. “तिच्या मणक्यात समस्या असल्यामुळे ती काम करू शकत नाही. मी तिला बर्दवानच्या दवाखान्यात घेऊन गेलो, तिथे डॉक्टरांनी यावर काही उपचार नसल्याचे सांगितले. मग मी तिला बेंगलोरच्या साई बाबा रुग्णालयात नेले पण तिथेही डॉक्टरांनीही तेच सांगितले. आमच्याकडे तिला इतर कुठल्याही सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला नेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत,” गावाबाहेर पडून इतरत्र रोजगार शोधण्याची परिस्थिती का निर्माण झाली हे स्पष्ट करताना तो पुढे सांगतो.

शेख गेली नऊ वर्षे मुंबईला कामासाठी येतो आहे. तो एका बांधकामाच्या साईटवर राजमिस्त्री (कुशल गवंडी, फोरमन) आहे. त्याच्या शेवटच्या कामाविषयी सांगताना तो म्हणतो, “सहसा आम्ही ‘कंपन्यां’साठी काम करतो, यावेळी पहिल्यांदाच मी एका खाजगी ‘पार्टी’साठी काम करत होतो.” ठाण्यामधील अनेक नामांकित बिल्डरांच्या गगनचुंबी इमारतींच्या बांधकामावर शेखने काम केले आहे. “मी सलग सहा महिने काम करतो आणि मग काही महिन्यांसाठी घरी येतो. त्यानंतर पुन्हा काही महिन्यांसाठी मुंबईला जातो, असे करत राहतो,” तो स्पष्ट करतो. 

जे काम मी मुंबईत करतो त्यासाठी मला दिवसाला ५०० ते ६०० रुपये मिळतात. त्याच कामाला बिरभूममध्ये २०० ते ३०० रुपये मिळतात,” असे म्हणत शेख त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जगवणाऱ्या या जीवापाड मेहनतीमागचे गणित सांगू लागतो. “आम्ही कोलकात्याला न जाता मुंबईला जातो कारण तिथे आमच्या चांगल्या ओळखी आहेत. कोलकात्यामध्ये मी कोणालाही ओळखत नाही. मुंबईमध्ये मी महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमावतो. त्यापैकी दहा हजार रुपये मी घरी पाठवतो. बाकीचे पैसे मला माझ्या खर्चासाठी आणि भाड्यासाठी लागतात. या लॉकडाऊनमुळे मला ३० ते ४० हजारांचा फटका बसला आहे. हे नुकसान कसे भरून काढणार,” शेख म्हणतो. 

यावर्षी १९ फेब्रुवारीला शेख मुंबईला परत आला. “आम्ही अजून नीटसे स्थिर-स्थावर सुद्धा झालो नव्हतो तेवढ्यात अचानक लॉकडाऊनची घोषणा झाली! आम्ही सहा जण गिरगावातल्या एका चाळीत राहतो. काम थांबलं आणि आम्ही दिवसभर फक्त बसून होतो,” लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी तो सांगतो. जेव्हा लॉकडाऊन अजून वाढला तेव्हा मात्र आम्हाला उपासमारीची भीती वाटायला लागली. आमच्याकडे खायला काहीही नव्हते आणि दुकानेही उघडी नव्हती. काळजीपोटी मी (बांगला संस्कृती मंचच्या) समीरुल दाला फोन केला. काही दिवसांनी आम्हाला सीजेपीकडून (सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस) रेशन मिळाले. शेख सीजेपीबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मी अजूनही तीस्ता मॅडमना (तीस्ता सेटलवाड, सचिव, सीजेपी) त्यांची चौकशी करण्यासाठी कॉल करतो. आमच्या संकटाच्या वेळी त्यांनी आमच्यासाठी जे केले ते मी कधीही विसरणार नाही. यासाठी मला त्यांच्या मनापासून धन्यवाद द्यावयाचे आहे,” भावनावश झालेला शेख म्हणतो.

लॉकडाऊन जसजसा वाढत गेला त्याबरोबर शेख आणि त्याचे मित्र आणि सोबतचे कामगार घरी जाण्यासाठी उतावीळ झाले. “आम्ही लोकांना घरापर्यंत सोडत असलेल्या बसेसबद्दल ऐकले तेव्हा आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला गेलो. त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना अजून पश्चिम बंगाल सरकार कडून आवश्यक ती परवानगी मिळालेली नाही. ट्रेन्स सुद्धा सुरू नव्हत्या. आम्हाला काय करावे सुचत नव्हते. पण नंतर एके दिवशी परिस्थिती अचानक चिघळली आणि अनिश्चितेची जागा त्यांच्या जीवाला निर्माण झालेल्या स्पष्ट धोक्याने घेतली. “एका रात्री आमच्या शेजारच्या काही लोकांनी आम्हाला धमकावले. ते म्हणाले, ‘तुमच्यापैकी कोणालाही जर कोरोनाव्हायरसची लागण झाली तर एकालाही सोडणार नाही, आम्ही तुम्हाला जिवंत गाडून टाकू’. ते दारूच्या नशेत होते. त्यादिवशी आम्ही ठरवलं की काही झालं तरी आपण घरी जायला निघायचं,” त्या धमकीने अजूनही थोडासा घाबरलेला शेख म्हणतो.

त्यांच्या ओळखीच्या एकाने त्यांना ट्रक भाड्याने घ्यायला मदत केली. जर आम्ही अजून 60 लोक जमवू शकलो असतो तर आम्हाला प्रत्येकी 4200 रुपये द्यावे लागले असते. आम्ही 63 लोक मिळवले आणि ट्रक भाड्याने घेतला. प्रवासाच्या दिवशी आम्ही सकाळी लवकर नळबाजार येथून निघालो,” शेख सांगतो. पण त्यांची अग्निपरीक्षा आत्ताशी सुरू झाली होती. “जी एकमेव टॅक्सी आम्हाला मिळाली तिने प्रत्येक प्रवाशाकडून १२०० रुपयांची मागणी केली. आम्ही सहा जण होतो. आम्ही नकार दिला. त्यानंतर आमच्या संपर्कातील एकाने दोन खासगी मोटारींची व्यवस्था केली, त्यासाठी आम्हाला प्रत्येक सीटसाठी ५०० रुपये लागले. पोलिसांनी आम्हाला ऐरोली स्टेशनबाहेर अडवले. आम्हाला गाड्या तिथेच सोडाव्या लागल्या,” शेखच्या हे संगत असताना, जगात जे जे काही वाईट घडणे शक्य आहे, ते वाईटच घडत होते असेच चित्र उभे राहते! 

आता आम्हाला पिकअप करायचे ठिकाण बदलून ठाण्यातील कापूरबावडी हे ठरले होते. एका टॅक्सीवाल्याने आमच्याकडून प्रत्येकी १०० रुपये घेतले आणि आम्हाला माजिवडापर्यंत सोडले. तिथून दुसऱ्या एका टॅक्सीने आणखी १०० रुपये घेऊन आम्हाला कापूरबावडी येथे सोडले. आम्ही दुपारी १२ वाजता पोहोचलो. काही लोक शिजवलेले जेवण, पाणी आणि बिस्कीटे वाटत होते. मग आम्ही ट्रकची वाट बघत थांबलो, जो रात्री ३ वाजता आला,” शेख म्हणाला.

 

 

सुदैवाने त्यांच्या संपूर्ण प्रवासात जेवणाची समस्या उद्भवली नाही. “विशेषतः महाराष्ट्रात कुणी ना कुणीतरी आम्हाला नेहमी अन्न दिलं. फक्त पश्चिम बंगाल मध्ये आल्यावर आम्हाला काहीही मिळालं नाही. हा एक विचित्र प्रवास होता – रस्त्यात काहीही उघड नव्हतं. पोलिसांनी आम्हाला दोन वेळा अडवलं, मात्र आम्ही त्यांची समजूत घातल्यावर त्यांनी आम्हाला जाऊ दिलं.”

पण शेख आणि त्याचे सहप्रवासी हे एकटेच काही स्वतःचे घर गाठण्यासाठी असा कष्टप्रद प्रवास करत नव्हते. “आमचा ड्रायव्हर गाडी हळूहळू चालवत होता आणि इतर अनेक ट्रक सहजपणे आम्हाला ओव्हरटेक करून गेले. ते आम्हाला ओलांडून जात असताना मी पाहिले की ते सुद्धा असेच लोकांनी भरले होते. आमच्या आसपास किती ट्रक्स होते हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकणार नाही. संपूर्ण रस्ता आमच्या पुढे आणि मागे कित्येक मैल ट्रक्सच्या ठिपक्यांनी भरून गेला होता. रस्त्यावरील अपघातांच्या रोजच्या बातम्यांनी मी खूप घाबरलो होतो. मध्ये काही ठिकाणी रस्ता खराब आहे हे देखील आम्ही ऐकले होते.”

शेख आणि त्याच्या सहप्रवाशांना अर्थातच सोशल डिस्टन्सिंगची ही चैन परवडणार नव्हती. पण मग त्या महाभयंकर कोरोनोव्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीबद्दल काय? “आम्ही मास्क घातले होते पण, आम्ही गरीब लोक आहोत. आम्हाला घाबरून चालत नाही. घाबरून घरी बसणे हे फक्त श्रीमंतांनाच परवडू शकते. मलापण भीती वाटत होती. मी त्या विषाणूबद्दल ऐकले होते पण मी काय करू शकणार होतो? मला घरी पोहोचणे भाग होते,” शेख व्यवहारिकपणे म्हणाला.

बंगालच्या सीमेवर पोहोचल्यावर त्यांना पोलिसांनी अडवले आणि सगळ्यांना किसान मंडीत नेण्यात आले. आमच्या शरीराचे तापमान घेतले गेले आणि आमचे नाव, पत्ते आणि आधार कार्ड क्रमांक नोंदवून घेतले. आम्ही तेथे कित्येक तास होतो, पण त्यांनी आम्हाला फक्त थोडे चुरमुरे आणि पाणी याव्यतिरिक्त काही खायला दिले नाही. थोड्यावेळाने आम्ही संतप्त झालो आणि पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला जाऊ दिले,” आता स्वतःच्या राज्यात झालेल्या त्रासाबद्दल शेख सांगतो.

गावात परतल्यावर आम्हाला पंचायतीच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. पण तिथली परिस्थिती राहण्यासाठी खूपच वाईट होती. म्हणून मग रात्रीच्या अंधारात आम्ही तिथून निसटलो आणि आपाआपल्या घरी पळून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी शाळेबाहेर निदर्शने केली आणि पळून गेलेल्या काही जणांना परत आणण्यात आले. माझे घर गावापासून थोडे लांब आहे त्यामुळे माझ्या घरी कोणी आले नाही. पण मी स्वतःहूनच स्वतःला घराच्या एका खोलीत वेगळे ठेवले आहे. परत आल्यापासून आता मला १२ दिवस झाले आहेत,” अखेरीस आता त्याच्या स्वतःच्या लोकांमध्ये परतलेला शेख म्हणतो. 

राजकीय व्यवस्थेने आपला विश्वासघात केला असेही त्याला वाटते. “संपूर्ण प्रवासात आमची आपापसात याच विषयावर चर्चा चालायची की कशी आपल्याला कोणीही मदत केली नाही, ना राज्य सरकारने, ना केंद्र सरकारने. आमच्यावर एवढं मोठं संकट कोसळलेलं असताना एकही राजकीय नेता आमच्या मदतीसाठी पुढे आला नाही. घरी परतण्यासाठी आम्हाला खूप सारा पैसा खर्च करावा लागला. गेल्या काही महिन्यांमध्ये आमची काहीही कमाई झालेली नाही. याची भरपाई कोण करेल? हा दोष कोणाचा,” रागाने संतप्त झालेला शेख विचारतो. लुबाडणे आणि गुंडगिरी याशिवाय या लोकांना काहीही येत नाही. जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा कोणीही मदतीला येत नाही,” अखेरीस व्यवस्थेविरुद्धचा संताप तो व्यक्त करतो.

आणि आता, पुढे काय,” तो विचारतो. “इथे काहीही काम नाही. मनरेगाचं काम आमच्या गावात सुरू झालं आहे असं मी ऐकलंय पण माझ्याकडे जॉब कार्ड नाही. माझ्या आई-वडिलांकडे पूर्वी होतं पण माझ्याकडे नाही. या लॉकडाऊनमुळे ऑफिसेस पण बंद आहेत, मग मी माझं जॉब कार्ड कसं बनवणार? माझं आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मी पैसे कुठून कमवणार आहे हे मला माहीत नाही. पण मला एक गोष्ट नक्की माहित आहे की हा लॉकडाऊन असाच सुरू राहिला तर गरीब लोक उपासमारीने मरतील,” असे म्हणून टिंकू शेख थांबतो. त्याला माहित आहे की त्याचा संघर्ष अजूनही संपलेला नाहीये आणि त्याच्या भविष्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार अजूनही तशीच आहे.

भाषांतर सौजन्याने – योगेश पवार

संबंधित-

प्रवासी मजदूरों की डायरी: हाथ में काम नहीं, आगे क्या होगा पता नहीं: टिंकू शेख

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Go to Top
Nafrat Ka Naqsha 2023