Menu

Citizens for Justice and Peace

जमिनीसाठी संघर्ष केला म्हणून तुरुंगात डांबलं, त्यांनी ऐकवला तुरुंगातील दाहक अनुभव महाराष्ट्र टाइम्स

11, Mar 2019 | महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आदिवासींना त्यांच्या हक्काच्या वन जमिनी परत मिळाव्या म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो. सरकारविरोधात आवाज उठवला. त्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं. आमच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले. आमच्याविरोधात जमीन बळकाल्याचे, अतिक्रमण केल्याचे आणि चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

मुंबईः आदिवासींना त्यांच्या हक्काच्या वन जमिनी परत मिळाव्या म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो. सरकारविरोधात आवाज उठवला. त्यामुळे आम्हाला तुरुंगात टाकण्यात आलं. आमच्यावर खोटे गुन्हे टाकण्यात आले. आमच्याविरोधात जमीन बळकाल्याचे, अतिक्रमण केल्याचे आणि चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. आधीच तुरुंगात असलेल्या महिला कैद्यांचा आमच्यासमोरच छळ केला जात होता. त्यांना अमानूष मारहाण केली जात होती. त्यामुळे या महिलांप्रमाणेच आमचंही तुरुंगात जगणं असह्य झालं होतं… आम्हाला मानसिक छळाला सामोरे जावं लागत होतं. तुरुंगातील शोषणाला बळी पडलेल्या महिला त्यांचा तुरुंगातील दाहक अनुभव सांगत होत्या. निमित्त होतं ‘कैद के परे’ या कार्यक्रमाचं.

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि ऑल इंडिया युनियन ऑफ फॉरेस्ट वर्किंग पीपलच्या महासचिव रोमा यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ‘कैद के परे’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील तीन आंदोलक महिलांनी त्यांच्याबरोबरच तुरुंगातील इतर महिला कैद्यांच्या होणाऱ्या छळाचा दाहक अनुभव विशद केला.

‘जो जमीन सरकार की, वो जमीन हमारी’ हा नारा देत गेली अनेक वर्ष या महिला त्यांच्या हक्कांसाठी सरकारविरोधात लढतायत. अनेकदा तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षाही त्या भोगून आल्या. पण तरीही न डगमगता त्यांनी एकजुटीने आपला लढा सुरू ठेवला आहे. या महिला आहेत उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील आदिवासी महिला. सरकार व उद्योगपतींनी हडप केलेल्या आदिवासींच्या जमीनी त्यांना परत मिळाव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रोमा यांनी या महिलांच्याबरोबरीनं आवाज उठवला. सुकालो गोंड, किस्मतिया गोंड, राजकुमारी भुईया या आदिवासी महिलांच्या खांद्याला खांदा लावून त्या लढल्या. या लढ्यावेळी अनेकदा त्यांच्या वाट्याला तुरुंग आला. तुरुंगातील या दाहक अनुभवांना त्यांनी आज वाट मोकळी करून दिली.

अनेक गुन्ह्यांची कलमे आमच्यावर लावली आहेत. २००७ साली आणि २०१५ मध्ये मला जेलमध्ये जावं लागलं. जेलमधील परिस्थिती खूपच भयावह आहे. जेलमध्ये असताना लहान मुलांपासून ते गर्भवती महिला पाह्यला मिळाल्या. काही महिला तर पाच वर्षांपासून जेलमध्ये होत्या. तर काही महिला ४० वर्षांपासून तुरुंगात खितपत पडल्या आहेत. तर काही जणी कित्येक वर्ष आपल्या कुटुंबाला भेटल्याच नाहीत. तुरुंगातील या महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अज्ञानामुळं त्यांना कित्येक वर्ष जामीन मिळत नाही. शिवाय अनेकदा महिला पोलीसांकडून कैद्यांना मारहाण केली जाते, असा विदारक अनुभव या महिला कथन करत होत्या.

मी जेव्हा २००७ मध्ये जेलमध्ये गेले. तेव्हा तिथे ३० महिला होत्या. त्यांनतर जेव्हा मी २०१५ मध्ये जेलमध्ये गेले, तेव्हा त्या जागी १०० महिला होत्या. ३० जणांची जागा असलेल्या जागेत १०० महिलांना ठेवलं होतं. यावरून जेलमधील परिस्थिती आणि त्यांना दिली जाणारी वागणूक किती भयावह आहे, याची कल्पना तुम्ही करू शकता, असं रोमा यांनी सांगितलं.

सुकालो गोंड या पाच महिने जेलमध्ये होत्या. त्यांच्यावर अनेक खोटे गुन्हे नोंदवण्यात आले होते. जेलमध्ये असताना त्यांनी जेवण सोडलं होतं. जेलमध्ये असताना मासिक पाळी आल्यानंतर आम्हालाच ती सोय करायला लागायची. महिला पोलिसांना सॅनिटरी पॅड घेऊन आणायला सांगितल्यावर त्या २० टक्के कमिशन मागायच्या आणि यावर आवाज उठवल्यावर पोलीस मारहाण करायचे. इतकंच नव्हे तर, कैद्यांसाठी आलेल्या धान्यातील काहीच भाग कैद्यांना मिळायचा. त्यातील काही भाग पोलीस अधिकारी, तुरुंगाधिकारी वाटून घ्यायचे, असं सुकालो यांनी सांगितलं. आज या महिलांनी केलेल्या आंदोलनानला काही प्रमाणात यश आलं आहे. या महिलांनी त्यांची बळकावलेली ३५ हजार हेक्टर जमीन पुन्हा मिळवली आहे. या जमिनीत त्या सामुहिक शेती करतात. शिवाय आदिवासींसाठी शाळाही चालवली जात आहे.

 

The original article may be read here.

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Go to Top