तेरा वर्षांची लारा, आपण आपल्या काकाच्या लग्नासाठी हैदराबादला जाणार म्हणून खूप आनंदात होती. तिला तिचे नवे कपडे, दागिने घालायला मिळणार होते, केसांमध्ये फुलं माळायला मिळणार होती. सर्वात छान गोष्ट म्हणजे तिच्या हातांवर मेहेंदी काढली जाणार होती. तिला काकाच्या नवरीला पहिल्यांदा पाहीपर्यंत धीर धरवत नव्हता. पण यासाठी मात्र तिला मेहेन्दीच्या कार्यक्रमात म्हणजे परवापर्यंत वाट पहावी लागणार होती. जेव्हा सर्व स्त्रिया छान छान कपडे घालून नवरीचे लग्नाचे सुंदर कपडे घेवून तिच्या घरी जातील. तिच्या नवीन काकूचं नाव तसनीम होतं. पण लग्नासमारंभाआधी तिच्या काकाने सर्व मुलांना हैदराबाद मधलं प्राणीसंग्रहालय दाखवण्यासाठी नेण्याचं ठरवलं होतं. सगळी मुलं खूपच खूश होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०० वाजता सर्व नऊच्या नऊ मुलांना आंघोळी घालून आणि त्यांचा नाश्ता आटपून काकाने ठरवलेल्या गाडीत सहलीसाठी त्यांना बसवलं गेलं. पांढरीशुभ्र दाढी वाढवलेला एक रुबाबदार वृद्ध माणूस मुलांना प्राणीसंग्रहालयाला घेवून जाणाऱ्या गाडीचा चालक होता. ते निघाले आणि पुढचे काही तास त्यांनी त्या प्राणीसंग्रहालयात मनमुराद भटकण्यात, बर्फाचे गोळे, चॉकलेट, गोळ्या आणि त्यांच्या आवडीच्या इतर गोष्टी खाण्यात मजेत घालवले. शेवटी शेवटी तर त्या मुलांचं पोटं इतकं भरलं होतं की त्यांना अजून काही खाणं अशक्यच झाल.
जसजसा दिवस सरू लागला आणि सूर्य डोक्यावर तळपू लागला. तशी मुलांची चिवचिव मंदावली, काही मुलं पेंगळून गाडीत झोपी गेली. प्राणीसंग्रहालयापासून थोडया दूर पोहोचल्यानंतर खूपच तहान लागल्याने ती जागी झाली. घर यायला अजून बराच अवकाश होता.
लारा आणि तिच्या मोठ्या भावाला एक कल्पना सुचली. त्यांनी त्या वृद्ध चालकाला एका स्थानिक दुकानापाशी गाडी उभी करण्यास सांगितलं आणि त्याच्यांपैकी एकाने गाडीतून खाली उतरून त्या दुकानदाराला पाणी देण्याची विनंती केली. तहानलेली मुलं भरपूर पाणी पिऊन गाडीत शिरली तर त्यांना धक्काच बसला. घरी जाण्यासाठी गाडी सुरु करण्याऐवजी तो वृद्ध चालक कपाळाला आठ्या घालून बसला होता. कुठलीतरी गोष्ट त्याच्या मनाला डाचत होती. तो काळजीच्या सुरात त्यांना म्हणाला,” असं कुठल्याही जागी, कुणाच्याही हातचं पाणी पिऊ नये. आपल्याला त्या दुकानदाराचा धर्म किंवा त्याची जात ही माहित नाही.” लारा आणि इतर मुलांना आश्चर्याचा धक्काच बसला. एका तहानलेल्या मुलाला एखाद्या माणसाच्या जाती किंवा धर्मामुळे काय फरक पडतो? अखेर पाणी तर पाणीच राहणार ना? ते कुठुनही आलेलं असलं आणि कुणीही प्यालं तरीदेखील. मुलांच्या त्या वृद्ध चालकाशी या विषयावर जोरदार वाद झाला.
दुसऱ्या दिवशी लग्नाचा सोहळा थाटामाटात सुरु झाला. सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे सगळ्या मुली हातांवर मेहेंदी काढून घेत होत्या. एका मेहेंदीवालीला पूर्ण दिवसभरासाठीच बोलावलेलं होतं. बऱ्याच मुलींची मेहेंदी काढून झाल्यानंतर त्या दिवशी दुपारी मेहेंदी काढून घ्यायला लारा बसली. मध्येच त्या मेहेंदीवालीने लारा खूण करून एखाद्या मोठ्या माणसाला बोलवायला सांगितले कारण तिला भूक आणि तहान लागली होती. लाराने उत्साहात जाऊन एका थाळीत खास लग्नासाठी बनवलेली स्वादिष्ट पक्वान्नं आणि ग्लासात सरबत आणलं. त्याबद्दल तिचं कौतुक करण्याऐवजी त्या मेहेंदीवालीने कठोरपणे एखाद्या मोठ्या माणसाला बोलावून आणायला तिला सांगितलं. लारा यामुळे अस्वस्थ झाली पण तिने तिला सांगितलेलं काम पूर्ण केलं. नंतर ती मेहेंदीवाली हळूच लाराच्या मावशीच्या कानात कुजबुजली, बाहेरच्या उपाहारगृहातून काही खाद्यपदार्थ आणि एखाद शीतपेय मागवता येईल का? समजूतदारपणे मावशीने मान डोलावली.
गोंधळलेल्या लाराला लगेचच आपल्या प्रश्नांची उत्तर हवी होती. मावशीच्या मागे ती धावली आणि तिने, विचारलं पण मी आणलेलं इतकं स्वादिष्ट अन्न या मावशीने का खाल्लं नाही? आपण हे सगळं बाहेरून का मागवतोय? मावशी हळुवारपणे लाराला समजावू लागली, हे बघ लारा, जगात काही गोष्टी विचित्र असतात, काही वेळेस समजायला कठीण ही. या मावशीचा धर्म आणि काका, आजी यांचा धर्म वेगळा आहे. तिला या घरात शिजवलेलं अन्न खायचं नाहीये. तुला कळतंय का? लाराने हो आणि नाही या दोन्ही अर्थाने मान डोलावली. अन्न आणि पाण्याला वेगवेगळे धर्मही असतात हे तिला समजूच शकत नव्हतं. पण आता तिला हे समजू लागलं होतं की मोठ्या माणसांच्या जगात काही वेगळ्या आणि विचित्र पद्धती असतात, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. पण तिला सगळ्यात काळजी या गोष्टीमुळे वाटत होती कि, मोठी माणसं अशा प्रकारे वागतात की जसं काही त्यांना या पद्धती बदलण्याची किंवा त्यांची योग्यता तपासून बघण्याची जरुरीचं वाटत नाही.
0 Comments