तुलसी आणि स्मृती या एकमेकींशी सतत भांडत असल्या तरीही शाळेत त्या एकमेकांपासून दूर
क्वचितच असत. इतरवेळीअत्यंत गजबजलेल्या शहराच्या टोकाशी असलेल्या शाळेच्या आवारात शाळेची बस शिरली की शाळेच्या फाटकामागून हातात खाऊचा डबा, आणि पाण्याची बाटली खांद्याला लावलेली तुलसी शाळेत शिरे. तुलसीचं घर शाळेपासून अगदी जवळ, चालत जाता येण्यासारखं होतं. तुलसीला जेव्हा कांजिण्या आणि खूप जास्त ताप आला होता तेव्हाचे अकरा दिवस वगळता त्या दोघींचा रोजचा हा दिनक्रम कधी चुकला नाही.
एकदा स्मृती बसमधून खाली उतरली आणि तुलसी तिला भेटली की त्या दोघीही सतत गप्पाच मारत असायच्या. पहिल्यांदा दोघी आपापले डबे उघडून त्यातला खाऊ एकमेकींना दाखवायच्या. जसजशा त्या मोठया होत गेल्या तसतसं एकमेकींच्या घराबद्दलची जुजबी माहितीवर त्यांनी दुसरीचं घर काय प्रकारचं असावं याबद्दलची आपली मतं बनवली.
तो सोमवारचा दिवस होता. तुलसीला आनंदाचं भरतं आलं होतं. येत्या शनिवारी तिचे आई बाबा तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करणार होते, तेही गेल्या तीन वर्षात पहिल्यांदाच. आपल्या जीवश्चकंठश्च मैत्रीणीला आपलं घर आणि कुटुंब दाखवण्याची तिला ही नामी संधीच होती. शाळेची घंटा व्हायला काही मिनिटेच उरली होती, त्यानंतर लगेचच वर्ग सुरु होणार होते त्यामुळे दोघीनींही मधली सुट्टी होईपर्यंत एकमेंकीशी बोलता येणार नव्हतं. शिक्षकांनी सुद्धा अशा जोडगोळ्या फोडण्याचं मनावरंच घेतलं होतं. सहावीच्या वर्गातल्या या दोघीनांही एकमेकींपासून वेगळं करणं मग ओघानेच आलं. पहिले तीन तास जणूकाही कासवाच्या गतीनेंच सरकत गेले. एकदाची घंटा झाली आणि तुलसीने धावत जाऊन आपल्या वाढदिवसाची बातमी आपल्या मैत्रिणीला एकदाची सांगून टाकली. ही बातमी ऐकताच तुलसीच्या घरी जायला मिळणार या कल्पनेनं स्मृती खूश होऊन गेली. तुलसीला तर त्या दिवशीच्या जेवणात काय काय पदार्थ बनवायचे याबद्दलही सविस्तर बोलायचं होतं. दोघींनाही कधी एकदा आठवडा संपतोय असं होऊन गेलं होतं. जेवणाच्या सुट्टीत, शनिवारी कोणकोणते खेळ खेळायचे आणि इतर मुलांच्या खोडया कशा काढायच्या या चर्चेत दोघी रंगून गेल्या.
मात्र त्या रात्री स्मृतीने हा विषय आपल्या बाबांशी बोलताना काढला आणि तिच्या उत्साहावर विरजण पडलं. त्याआधी तिने घरी येताच पहिल्यांदा ही गोष्ट आपल्या आईला सांगितली होती. आईनं तिच्याकडे नुसतचं शांतपणे पाहिलं. काही क्षणांनी ती म्हणाली, “बाबा घरी आले की त्यांच्याशी बोल.”
स्मृती चिडून म्हणाली, ती माझी सर्वात लाडकी मैत्रीण आहे. का नाही मी तिच्या घरी जायचं? तुम्ही नाही का सारखे तुमच्या मित्रमैत्रिणींना भेटत? त्यांना जेवायला बोलवता. आई मग हळुवारपणे स्मृतीला म्हणाली.” ती आहे तुझी मैत्रीण, हवं तर वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिला छानशी भेट नेऊन दे.” बाबा म्हणाले, तुला माहीत आहे की आपण पूर्णत: शाकाहारी आहोत. तुलसीच्या कुटुंबातील मंडळीच न्हवेत तर त्यांचा संपूर्ण समाजच मांसमच्छी खाणारा आहे.” “मग काय झालं? मी सांगेन तुलसीच्या आईला माझ्यासाठी वेगळं जेवण करायला. छान स्वयंपाक करते तिची आई. मुळात वाढदिवसाचा आणि या गोष्टींचा संबंधच काय आहे?” स्मृतीचे आई बाबा शांतच राहिले मात्र स्मृती अस्वस्थच होती. तिला जाणवत होतं की आपण लढाई अजून जिंकलेली नाही.
उत्तरं शोधा :
- तुमच्या जवळच्या मित्रांच्या बाबतीत असं झालं तर तुम्ही काय कराल?
- तुमच्या आई वडिलांची समजूत घालण्यासाठी तुम्ही कोणाची मदत घ्याल?
- स्मृतीच्या आई बाबांनी तिला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पाठवावं असं तुम्हाला वाटतं का?
- तुमची उत्तरं आम्हाला नक्की लिहून पाठवा. तुम्हाला काय वाटतं ते जाणून घेण्याची आम्हाला खूप इच्छा आहे.
0 Comments